आमदार फोडायचा प्रयत्न केला तर, डोकी फोडू, हातपाय तोडू; शिवसेना आमदाराचा इशारा
Shiv Sena | (Photo credit: Archived, edited, representative images)

शिवसेना (Shiv Sena) आमदार कोणी फोडू शकत नाहीच. पण, जर कोणी तसा प्रयत्न केला आणि एक जरी आमदार फुटला तर, डोकी फोडू, हातपाय तोडू असा इशारा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिला आहे. सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमिवर राज्यात घोडेबाजार केला जाऊ शकतो. यात शिवसेनेचे काही आमदार फुटू शकतात अशी भीती व्यक्त करत शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारण्या आला होता. या वेळी उत्तरादाखल दिलेल्या प्रतिक्रियेत सत्तार बोलत होते. दरम्यान, सत्तेसाठी आमदार फोडाफोडीचं राजकारण घडू शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पण, कोणता पक्ष कोणाचे आमदार फोडणार याबाबत उघड चर्चा कोणीच करत नाही. जर असे काही घडलेच तर राजकारण किती टोकाला जाऊ शकते याची चुणूक अब्दुल सत्तार यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवल्याची चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल लागून आता एक महिना व्हायला आला. तरीही राज्यात सत्तास्थापनेचा पत्ता नाही. उलटपक्षी राज्यातील सत्तासंघर्षाने टोक गाठले आहे. हा सत्तासंघर्ष आता कोणत्या टोकाला जाणार या चिंतेत राज्यातील जनता आहे. असे असतानाच शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी एक धक्कादायक विधान करत संबंधितांना इशारा दिला आहे. राज्यातील पक्षीय बलाबल पाहता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची नैतिक जबाबदरी शिवसेना-भाजप यांच्यावर येते.

शिवसेना-भाजप यांनी निवडणूकपूर्व युती केली आहे. त्यामुळे ही जाबबदारी अधिक वाढते. मात्र, मुख्यमंत्रीपद आणि समसमान सत्तावाटप या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये वितूष्ट आले आहे. या पार्श्वभूमिवर विधानसभेतील सर्वाधीक जागा मिळवणारा पक्ष म्हणून भाजपने सत्तास्थापनेचा दावा करणे अपक्षीत होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे राज्यात भाजपेत्तर पक्ष आघाडी करुन सत्तेवर येणार अशी चिन्हे आहेत. मात्र त्यांचेही घोडे किमान समान कार्यक्रमावर अडले आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात लवकरच नवे सरकार स्थापन होणार? सत्तास्थापनेबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आज महत्वपूर्ण बैठक)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजच भेट घेतली. ही भेट 45 मिनिटे चालली. या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकऱ्यांची स्थिती यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, या बैठकीत राजकीय विषयावरही चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीत जर राजकीय चर्चा झालीच असेल तर ती कोणत्या पातळीवरची असेन. याबातब उत्सुकता आहे.