महाराष्ट्रात लवकरच नवे सरकार स्थापन होणार? सत्तास्थापनेबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आज महत्वपूर्ण बैठक
Sonia Gandhi, Sharad Pawar (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाली असून राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने अधिक जागा मिळवल्या असून मुख्यमंत्रीपदावरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. भाजपने सत्तास्थापनेबाबत असमर्थता दर्शवल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी तयार असून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी राष्ट्रवादी- काँग्रेसची आज बैठक पार पडणार आहे. महत्वाचे म्हणजे, या बैठकीनंतर राज्यात नवे सरकार येणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेक दिवस उलटली तरीदेखील राज्यात सत्तास्थापन झाली नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या तरीदेखील त्यांना राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेची गरज भासत होती. दरम्यान, दोन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु झाली आणि शेवटी युती तुटली. विधानसभा निवडणूक पार पडण्याअगोदर भाजपकडे अडीच वर्षे तर, उर्वरीत वर्षे शिवसेनाकडे मुख्यमंत्रीपद असणार, असा फॉर्म्युला ठरला होता. असा दावा शिवसेना करत आहे. तर, भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदावरुन कोणाताच शब्द दिला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण अधिकच पेटले. परिणामी, शिवसेनेने आक्रमक भुमिका घेऊन भाजपवर शाब्दिक हल्ला चढवायला सुरुवात केली. त्यावेळी भाजपने विरोधी बाकावर बसणार असल्याची इच्छा दर्शवल्यानंतर महाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होईल, असे वातावरण निर्माण झाले. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस आणि शिवसेना दोन्हीही पक्ष परस्परविरोधी विचारधारेचे आहेत. जर काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर, याचे वाईट परिणाम इतर राज्यातील अगामी विधानसभा निवडणुकीत दिसतील, अशी शक्यता काँग्रेसचे काही नेते व्यक्त करत आहेत. हे देखील वाचा-सोनिया गांधींनी घेतली मवाळ भूमिका; कॉंग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीशी चर्चा करण्यास संमती, आज ठरणार नवा फॉर्म्युला?

दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे आमदार पक्षावर दबाव टाकत आहेत. काँग्रेसला मिळालेली ही संधी पक्षाने सोडू नये, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे आमदार सोनिया गांधी यांच्याकडे करत आहेत. एका वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसचे अनेक नेते आणि आमदार शिवसेनाला पाठींबा देण्यास अनुकूल आहेत. हीच गोष्ट सोनिया गांधी यांच्यासमोर मांडण्यात आली. तसेच शिवसेनाला पाठींबा दिल्याने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकतो. दोन्ही पक्षांची रणनीती ठरवताना, एकदा किमान समान कार्यक्रम नक्की केल्यानंतर पुढे जास्त समस्या उद्भवणार नाहीत हेही सोनिया गांधी यांना पटवून देण्यात आले. यासाठीच आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यांच्यात होणाऱ्या बैठकीत सोनिया गांधी कोणती भुमिका बजावतात? याकडे अनेकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.