अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी एका रात्रीत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पडदा टाकला खरा मात्र त्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच गढूळ झाले असून मोठा सत्तापेच निर्माण झाला आहे. या सत्तापेचावर आज सकाळी 10.30 वाजता अंतिम निर्णय लागणार असून सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत या सत्तापेचावर एक वेगळाच ट्विस्ट आणला आहे. सोमवारी संध्याकाळी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकजुटीची शपथ घेतली.
राज्यातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार असताना शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने सोमवारी शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम घेतली. राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा आज सुटणार असून सर्वांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. या सगळ्या गोष्टीकडे नकळतपणे भाष्य करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक खोचक ट्विट केले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2019
सोमवारी झालेल्या युक्तिवादात मांडलेल्या मुद्द्यानुसार, राज्यपालांची बाजू अधिक भक्कम असल्याचे दिसत आहे, मात्र ज्या 54 आमदारांच्या आधारे राष्ट्रवादी भाजपला समर्थनं दिले त्यांची सद्य स्थिती वकील कोर्टासमोर मांडू शकलेले नाहीत. तर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विधानसभेत हंगामी अध्यक्षांची नेमणूक करून तातडीने फ्लोर टेस्ट घेण्याची मागणी लावून धरली आहे.
महाधिवक्ता तुषार मेहता यांनी राज्यपालांकडे सत्ताधारी पक्षाकडून सोपवण्यात आलेले कागदपत्र कोर्टासमोर सादर केले. अखेरीस कोणत्या कागदपत्रांच्या आधारे सद्य सरकारची स्थापना झाली आहे हे दाखवत सरकारी वकिलांनी राज्यपाल कोश्यारी यांची बाजू उचलून धरली. कालच्या युक्तिवादानंतर अखेरीस आज सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात अंतिम निर्णय देणार आहे. आज सकाळी 10.30 वाजता ही प्रक्रिया सुरु होईल.