Kalidas Kolambkar | Photo Credits: Twitter/ANI

महाराष्ट्रामध्ये आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हळूहळू राज्यातील सत्ता कोंडी फुटायला सुरूवात झाली आहे. बहुमत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळले आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेसाठी हंगामी अध्यक्ष (Protem Speaker) म्हणून भाजपाच्या कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांची निवड करण्यात आली आहे. आज संध्याकाळी राज्यपाल त्यांना गोपनीयतेची शपथ देणार आहेत.

कालिदास कोळंबकर हे भाजपाचे आमदार असून वडाळा विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले आहेत. हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, के सी पाडवी, दिलीप वळसे पाटील यांचीही नावं होती.

उद्या महाविकासआघाडीचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने बहुमत ठराव घेण्याचे आदेश दिल्यानंतर दुपारनंतर राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.