महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून (Government Formation) राजकीय पेच वाढला आहे. राज्यात 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चेहऱ्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. अशा परिस्थितीत शपथ विधी आणि सरकार स्थापनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सध्या मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जैय्यात तयारी सुरु आहे, अशात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे आणि 19 मुख्यमंत्री आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे.
दुसरीकडे, मंगळवारी असे अनेक अहवाल समोर आले, ज्यामध्ये महायुती सरकारमध्ये सामील केले जाण्याची शक्यता असणाऱ्या भाजपच्या 17 संभाव्य मंत्र्यांची नावे सुचवण्यात आली आहेत. मुंबई प्रदेशातून भाजपचे मंत्री आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, नितेश राणे आणि अतुल भातखळकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातून माधुरी मिसाळ, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील, गोपीचंद पडळकर या नेत्यांची मंत्रिमंडळाच्या यादीत नावे असल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांचा समावेश केला जाऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातून जयकुमार रावल आणि गिरीश महाजन यांसारखे नेते मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात, तर मराठवाड्यातील नेते अतुल सावे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश होऊ शकतो. शिवाय, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सात मंत्री मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत, अर्जुन खोतकर अशी या मंत्र्यांची नावे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, इतर अनेक नेते मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता आहे. यामध्ये छगन भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील आणि नरहरी झिरवाळ यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे समारंभाच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी सोमवारी दक्षिण मुंबईतील कार्यक्रमस्थळाला भेट दिली. शपथ विधी तयारीला अंतिम रूप देण्यासाठी मंगळवारी प्रदेश भाजप कार्यालयात बैठक झाली, ज्यामध्ये मुंबई युनिटचे प्रमुख आशिष शेलार, महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षाचे नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि इतर उपस्थित होते. भाजपने राज्यभरातील धार्मिक नेते, कलाकार आणि लेखकांनाही आमंत्रित केले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करताना शपथविधी सोहळा महायुती आघाडीचा आत्मा दर्शवेल, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. (हेही वाचा: Ramdas Athawale suggests Eknath Shinde: रामदास आठवले यांचा एकनाथ शिंदे यांना सल्ला; मुख्यमंत्री पदाबाबत काय म्हणाले? घ्या जाणून)
दोन वेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले फडणवीस हे सर्वोच्च पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहेत. बुधवारी सकाळी राज्य विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. या बैठकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.