महाराष्ट्रात राजकीय हालचालींचा वेग वाढला; आदित्य ठाकरे 'रिट्रीट' हॉटेलमध्ये मध्यरात्रीपासून मुक्कामी
Aaditya Thackeray (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राच्या 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 च्या मध्यरात्री संपल्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. काल महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता भाजपा सत्ता स्थापन करू शकते का? यासाठी चर्चा सुरू झाल्या आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्तेची समीकरण जुळवण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना आणि भाजपाला मतदारांनी कौल दिला असला तरीही सध्या समान सत्तेसाठी भांडणार्‍या शिवसेना आणि भाजपामध्ये सध्या तणावाचे संबंध आहेत. शिवसेनेने त्यांचे आमदार सध्या मालाडा येथील रिट्रीट हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवले आहेत. काल रात्री उशिरा आदित्य ठाकरे यांनी आमदारांची भेट घेतली. तेव्हापासून आदित्य देखील रिट्रीट हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.

दरम्यान आज दुपारी 12.30 वाजता एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.  Maharashtra Government Formation: राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून भाजपला 11 नोव्हेंबरला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण- सूत्र.

देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना भाजपा- शिवसेनेचे संबंध तणावपूर्ण असल्याची माहिती दिली होती मात्र यावर चर्चेने वाटाघाटी होऊ शकतात. सत्ता स्थापनेसाठी आपण फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, घोडे बाजार होणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सारेच पक्ष दक्ष राहिले आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी सर्वाधिक आमदार भाजपाकडे असल्याने त्यांना राज्यपालांकडून आलेल्या आमंत्रणावर निर्णय घेण्यासाठी आज भाजपाच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील राजकीय कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

भाजपाला विधानसभा निवडणूकीच्या मतदानामध्ये 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. राज्यात सत्ता स्थापनेसाठी145 हा बहुमताचा आकडा आहे. मात्र हे राजकीय गणित महायुती जुळवून आणते का? हे पाहणं आता उत्सुकतेचं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाकडून आमदारांना धाक अअणि पैशांचे आमीष दाखवून घोडाबाजार होत असल्याचे आरोप करण्यात आले होते.