महाराष्ट्रात विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपले आहे. मात्र अद्याप राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली नाही. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्यात आले असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्याचसोबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या या निमंत्रणावर भाजप (BJP) काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच रविवारी भाजप पक्षाच्या कोरकमिटीची बैठक पार पडणार असल्याचे पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना-भाजप मध्ये सत्ता स्थापनेवर वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. त्याचसोबत शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे याबाबत ठाम असून भाजपने याचा विरोध केला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सोपवल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केलीच पण पुन्हा राज्यात भाजपची सत्ता स्थापन होणार असा सुचक इशारा सुद्धा व्यक्त केला. त्यानंतर आता राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे. यानंतर आता राज्यात राजकीय पक्षाअंतर्गत हालचालींना वेग आल्याचे ही सांगण्यात येत आहे.('काळजीवाहूं'ना बांधून ठेवलेल्या सामानावर बसून कारवाया करता येणार नाहीत; देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचा टोला)
भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने निमंत्रण देण्यात आले असून त्यांना निवडणूकीत शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपला 105 शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ज्या पक्षांच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता फडणवीस यांना कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री पद सोपावले आहे. मात्र आता को्श्यारी यांच्याकडून आमंत्रण आल्याची सुत्रांकडून माहिती देण्यात आल्यानंतर भाजप नेत्यांनी अद्याप काही विधान केलेले नाही. मात्र लवकरच महाराष्ट्रात कोणचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होणार आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना,काँग्रेस आणि एनसीपी सत्ता स्थापन करणार का याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.