सोलापूर (Solapur) येथील उजनी धरणात (Ujani Dam) सेल्फी घेताना बोट उलटल्याने बाप- लेकांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी जलाशयात असणाऱ्या इतर मच्छीमारांनी तातडीने पाण्यात उड्या टाकून चौघांचे प्राण वाचवले आहे. वाचवण्यात आलेल्या एका महिलेसह एका मुलीला उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. सध्या उजनी जलाशयात खूप पाणी असून पाण्याची पातळी देखील खूप खोल असल्याने पाण्याचा अंदाज येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
विकास शेडगे (वय, 39) आणि त्यांचा मुलगा जय शेडगे (वय, 13) असे मृतांची नावे आहेत. विकास शेडगे हे आपल्या कुटुंबियांसह करमाळा तालुक्यातील केम येथे लग्नासाठी आले होते. दरम्यान, शेडगे कुटुंबाला अकलूज येथील उजनी जलाशयात नावेतून फिरण्याचा मोह झाला. मात्र, नावेत बसलेले असताना विकास शेडगे यांना सेल्फी काढण्याची इच्छा झाली. मात्र, सेल्फी काढत असताना बोट उलटली आणि सर्वजण पाण्यात पडले. त्यावेळी जलाशयात असणाऱ्या इतर मच्छीमारांनी तातडीने पाण्यात उड्या टाकून विकास यांची पत्नी, नऊ वर्षाची मुलगी यांसह त्यांचे मित्र जयवंत सातव आणि त्यांच्या मुलाचे प्राण वाचवले. परंतु, दुर्देवाने विकास शेडगे आणि जय यांचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Nagpur: काळी जादू! पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत एका तरूणीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न
यापूर्वी दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने उजनी जलाशयात नाव उलटून अकलूज येथील काही डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. सध्या उजनी जलाशयात खूप पाणी असून पाण्याची पातळी देखील खूप खोल असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या मच्छिमारांनी दिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.