राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनीही शिवसेना पक्षावर साधला निशाणा
Amol Kolhe (Photo Credit: Instagram)

शिवसेना पक्षाने नुकताच त्यांचा वचननामा जाहीर केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करुन शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनीही अहमदनगर येथील जाहीर सभेत आक्रमक भुमिका घेत शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. शिवसेना 10 रुपयात जेवणाची थाळी देत असे म्हणते तर, याआधी झुणका भाकर केंद्र सुरु केले होते त्याचे काय झाले. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला या प्रश्नांची उत्तरे द्या, असे बोलत अमोल कोल्हे यांनी शिवसेना पक्षावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणावीस यांच्या विधानावरही जोरदार टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने शनिवारी आपला वचननामा जाहीर केला आहे. यात शिवसेना पक्षाकडून महाराष्ट्रातील जनतेला 10 रुपयांत भोजन देण्याचे प्रमुख वचन देण्यात आले आहे. त्यावरुन विरोधकांनी शिवसेनेवर टीका करायला सुरुवात केली आहे. यामध्ये आता अमोल कोल्हे यांच्या टीकेची भर पडली आहे. शिवसेनेच्या वचननाम्यावर टीका करत अमोल म्हणाले की, "जर शिवसेना 10 रुपयात जेवणाची थाळी देणार असे म्हणते तर, 12 कोटी लोकसंख्या असलेला महाराष्ट्रच विचारतो, झुणका भाकरच काय झाले शिववडा त्याचे काय झाले एवढेच नव्हे तर, गेल्या पाच वर्षात तुम्ही काय केले याची उत्तर द्या", असेही अमोल कोल्हे म्हणाले आहेत. हे देखील वाचा-'तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला' राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून शिवसेना पक्षावर टीकास्त्र

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आव्हान करत अंगाला तेल लावून बसलोय असे विधान केले होत. यावर विधानावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले आहेत की, "समोर पैलवान नाही. पुढून, मागून कसेही पाहिले तरी गडी पैलवान वाटत नाही".