महाराष्ट्र: धुळे येथे लॉकडाउन आणि संचारबंदी कायम असताना दुकानदारांसह नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन
Dhule (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसने  (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. मात्र तरीही काही ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान धुळे हा रेड झोन मध्ये आहे तरीही येथे लॉकडाउन आणि संचारबंदी कायम असताना नागरिकांसह दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे.

धुळ्यात बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी करत नागरिक फळे, भाजीपाला खरेदी करत होते. तसेच कपड्यांची दुकाने, विविध वस्तू विक्रेत्यांनी सुद्धा खुलेआम दुकाने सुरु केले होते. काही दुकानदारांनी दुकानाचे अर्धे दरवाजे उघडे ठेवत व्यवसाय सुरु केल्याने त्यावेळी झालेल्या गर्दीमुळे नियमांचा मात्र फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे. धुळ्यात एकूण 80 कोरोनाबाधित रुग्ण असून 8 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. नागरिकांना आपण रेड झोन मध्ये आहोत हे सुद्धा कळत नसून नियमांचे सर्रास पायमल्ली केली जात आहे.(Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांची 33,053 वर पोहोचली आहे. यात काल दिवसभराता राज्यात कोरोनाचे 2,347 रुग्ण आढळले आहेत. तर 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची एकूण संख्या ही 1,198 वर पोहोचली आहे. तर 7,688 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत.