Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांमध्ये लसीकरणाबाबत (Vaccination) शीतयुद्ध सुरु आहे. राज्याला पुरेसा लसींचा पुरवठा होत नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. मात्र केंद्राने ही गोष्ट अमान्य केली आहे. लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्र राज्याने, आजपर्यंत 97 लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर सातत्य राखून आहे. आज दिवसभरात सुमारे 3 लाख जणांना लस देण्यात आली असून आकडेवारी अंतिम होईस्तोवर त्याहीपेक्षा जास्त असेल.

महाराष्ट्राकडे आज सकाळपर्यंत लसीचे सुमारे 10 लाख डोसेस होते. आज 4.59 लाख डोस मिळाले आहेत. मात्र हे डोसही पुरेसे नसल्याने सध्या राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावरील लसीचा साठा संपल्याने काम थांबले आहे. राज्याने केंद्राकडे अजून लसीचे डोस देण्याची मागणी केली आहे.

काल, डॉ. हर्ष वर्धन यांच्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Union Minister Prakash Javadekar) यांनी, महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला असून, राज्याने लसचे 5 लाख डोस वाया घालवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात लसीचे 23 लाख डोस आहेत, जे पुढील 5 दिवसांसाठी पुरू शकतील. प्रत्येक राज्यात कोविड लशीचा 3 ते 4 दिवसांचा साठा आहे. विविध जिल्ह्यांमध्ये ही लस पुरवणे ही राज्याची जबाबदारी आहे. (हेही वाचा: राज्यातील निर्बंधांदरम्यान नक्की काय सुरु व काय बंद याबाबत शासनाने जारी केले FAQs; जाणून घ्या कोणती दुकाने उघडी असतील)

याला प्रतुत्तर देताना राजेश टोपे म्हणाले, लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा.