Coronavirus in India (Photo Credits: Getty Images)

देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणू (Coronavirus) बाधितांची संख्या वाढतच आहे, त्यात महाराष्ट्र (Maharashtra) हा आघाडीवर आहे. एकीकडे राज्याचा मृत्युदर हा जगात सर्वात जास्त असल्याची बातमी येत असताना, आज महाराष्ट्रात 232 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, राज्यात एकूण रुग्ण संख्या 2916 झाली आहे. आज 36 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आतापर्यंत 295 रूग्ण बरे झाले आहेत व त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 187 मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी आज 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवरची उपचारपद्धती, गंभीरावस्थेतील रुग्णांना वाचविणे यासह इतर वैद्यकीय मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील प्रमुख कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा पार पडली. यामध्ये टास्क फोर्सचे डॉक्टर्सही सहभागी होते. (हेही वाचा: Coronavirus: ओला कंपनीची आता मुंबई महापालिका सोबत भागीदारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मदत करणार)

देशाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, देशात गेल्या 24 तासांमध्ये 1,118 नवीन प्रकरणे समोर आली आहेत व अशाप्रकारे भारतातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 11,933 वर पोहचली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये, बीएमसीने (BMC) दिलेल्या माहितीनुसार आज शहरात 183 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह केसेस आणि 2 मृत्यूची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईतील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1936 आणि मृत्यू 113 झाले आहेत. आतापर्यंत 181 रुग्णांना सोडण्यात आले आहे. पुण्यात आज एका 49 वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला, हा पुण्यातील आजच्या दिवसातील 5 वा मृत्यू होता.