Coronavirus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात दिवसागणिक हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांनी नोंद होत आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता राज्यात आज कोरोनाचे आणखी 11,111 रुग्ण आढळून आले असून 288 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच 8,837 जणांनी प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहता रुग्णांची संख्या 5,95,865 वर पोहचली आहे.

राज्यात आतापर्यंत 1,58,395 अॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण असून एकूण 4,17,123 जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्याचसोबत राज्यात कोरोनामुळे जवळजवळ 20,037 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तसेच कोरोनावर अद्याप ठोस लस उपलब्ध नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर अभ्यास करत आहेत. नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीत स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचसोबत राज्यात जरी कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या असली तरीही रिकव्हरी रेट अधिक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते. (महाराष्ट्रात पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 33 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू)

दरम्यान, राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात ही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळुन येत आहेत. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावर नियंत्रण मिळवण्यासह हॉटस्पॉट ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. तर देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहता रुग्णांचा आकडा 25,89,683 वर पोहचला असून 49980 जणांचा बळी गेला आहे. सध्या 677444 जणांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 1862259 जणांची प्रकृती सुधारली आहे.