राज्य सरकारने कोरोना महामारी नियंत्रणासाठी घातलेले सर्व निर्णय हटवले (Maharashtra Coronavirus Restriction Free) आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त झाला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र मास्कमुक्तही झाला आहे. ज्या नागरिकांना मास्क वापरावा असे वाटते त्यांनी वपरावा. ज्यांना नाही वाटत त्यांनी वापरु नये. मास्क वापरण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी ऐच्छिक आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आजच पार पडली. या बैठकीत झालेल्या विविध निर्णयांबाबत माहिती देताना राजेश टोपे बोलत होते.
राज्यातील निर्बंध हटविल्यामुळे यापुढे साजरे होणारे सर्व सण, उत्सव नागरिकांना मोठ्या उत्साहात साजरे करता येणार आहेत. मग तो सण गुढी पाढवा असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आले आहे. त्यामुळे आता निर्बंध कायम ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचेही टोपे यांनी सांगितले. (हेही वाचा, Maharashtra Coronavirus Restriction Free: महाराष्ट्र कोरोना निर्बंध मुक्त, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय)
दरम्यान, राज्य सरकारने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठीही मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागात काम करणाऱ्या 41 ते 50 या वयोगटातील कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये इतक्या मर्यादेत संपूर्ण आरोग्य तपासणी करुण घेता येणार आहे. राज्य सरकारतर्फे ही तपासणी मोफत करुन दिली जाईल. याशिवाय 51 ते 60 वयोगटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांच्याच खर्च मर्यादेत ही तपासणी राज्य सरकारतर्फे मोफत करुन दिली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.