Balasaheb Patil: राज्यात कोरोना विषाणूचं सावट अधिक गडद होताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेते कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले. आता महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात बाळासाहेब पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
या ट्विटमध्ये बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे की, 'काल माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. रात्री रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. तब्येत ठीक आहे. काळजी करण्याची गरज नाही. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आठवडाभर विलगिकरणात राहावे,' असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे. (हेही वाचा - सातारा येथे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच एका कुटुंबाने न्याय मागण्यासाठी चक्क अंगावर पेट्रोल टाकून केला आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने टळला अनर्थ)
बाळासाहेब पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून अँटीजेन टेस्टसह आरटीपीसीआर चाचणी केली होती. ही चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
काल माझी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती, रात्री रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. तब्येत ठीक आहे, काळजी करण्याची गरज नाही. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आठवडाभर विलगिकरणात राहावे.
— Balasaheb Patil (@Balasaheb_P_Ncp) August 15, 2020
दरम्यान, बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते असून त्यांच्यावर साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आहे. 1999 पासून बाळासाहेब पाटील हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी ठाकरे सरकारमधील अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अस्लम शेख आदी मंत्र्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.