सरकारी दस्ताऐवजांवर औरंगाबादचा परस्पर संभाजीनगर उल्लेख पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली जावी: बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात सध्या एकापाठोपाठ एक शहरांची नावं बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामध्ये सध्या बहुचर्चेमध्ये असलेले एक शहर म्हणजे औरंगाबाद. औरंगाबादचा उल्लेख काल सीएमओ ट्वीटर अकाऊंटवर संभाजीनगर करण्यात आला आणि त्याचे राजकीय पडसाद पहायला मिळाले. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट करत आमचा शहरांच्या नामांतरणाला विरोध आहे असे ठाम ट्वीट केले. त्यानंतर आज (7 जानेवारी) पुन्हा पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीएमओ अधिकृत ट्विटर हॅन्डलवर परस्पर औरंगाबदचं नाव संभाजीनगर म्हणून करणं चूकीचं आहे. हा सरकारी दस्ताऐवजाचा एक भाग आहे. कदाचित ही अनावधानाने झालेली चूक असू शकते पण ती पुन्हा होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. Balasaheb Thorat On Renaming of Cities: शहरांच्या नामांतराला काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध; बाळासाहेब थोरात यांचा महाविकासआघाडी सरकारला इशारा.

महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात असल्याने शिवसेना, एनसीपी, कॉंग्रेसचं एकत्र सरकार राज्याचा गाडा हाकत आहे. मात्र त्यांच्या मुळात विचारसरणी वेगळी असल्याने अनेकदा समन्वयाचा अभाव असल्याचं समोर येत असल्याने काही गोष्टींवरील वेगवेगळी मतं समोर येताना दिसतात. दरम्यान आज पत्रकार परिषदेमध्येही महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर काम करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. शहरांच्या नामांतरणाचा त्यामध्ये समावेश नाही. अशाप्रकारच्या नामांतरणामुळे कोणत्याही सामान्य जनतेच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही. त्यांचं आयुष्य बहरत नाही असे सांगत शहरांच्या नामांतरणाला थेट नकार असल्याचं म्हटलं आहे.

नामांतरणावरून वेगवेगळी भूमिका असली तरीही त्याचा आता लगेच आघाडीत बिघाडी होण्याशी संबंध नाही. अनेक प्रश्नांवर चर्चेतून आम्ही उत्तरं शोधलं आहे त्यामुळे यावरही चर्चा होईल. ट्वीट अनेकांपर्यंत पोहचलं आहे त्यामुळे आमची भूमिकाही त्यांना आता पर्यंत समजली असेल असे सावध उत्तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं होणार का? या प्रश्नावर बाळासाहेब थोरातांनी दिलं आहे.

दरम्यान सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात संभाजीनगर असा उल्लेख हा संपादकाच्या हक्काचा आहे. तसेच औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला आम्ही मंजुरी दिली होती आता तो केंद्र  सरकारकडे प्रलंबित विषय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.