Congress | (File Image)

महाराष्ट्र काँग्रेस (Maharashtra Congress) नेत्यांची एक बैठक दिल्ली (Delhi) येथे पार पडत आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख नेते दिल्लीत हजर झाले आहेत. ही बैठक (Maharashtra Congress Leader Meeting at Delhi) महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील ( H K Patil) यांच्या उपस्थित होणार आहे. या बैठकीस हायकमांडही उपस्थित राहू शकते अशी सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रातील प्रदेशाध्य पदावरील नेतृत्वात बदल तसेच, आगामी काळात देशात पार पडणाऱ्या पाच राज्यांतील सार्वत्रिक निवडणुका याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीस काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह सुनील केदार (Sunil Kedar), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), अशोक चव्हाण (Ashok Chavan), के सी पाडवी (KC Padvi) यांच्यासह इतरही अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

एच. के. पाटील यांनी महाराष्ट्र प्रभारी पदाची सूत्र हाती घेतली. तेव्हापासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बरीच हालचाल आणि फेरबदलही होताना दिसत आहेत. याची चुणूक मुंबई काँग्रेस अध्यक्षपद बदलावरुन दिसून आली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भाई जगताप यांच्याकडे नुकतेच सोपविण्यात आले. आता महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष पदावरील नेतृत्व बदलाचीही चर्चा जोरदार सुरु आहे. सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आहे. त्यांच्याकडे राज्येच महसूलमंत्रीपद आणि विधिमंडळ गटनेता पदही आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याची आवश्यकता असल्याचे काँग्रेसमधील काहिंचे मत आहे. दिल्लीतील नेतृत्वाचीही त्याला मान्यता असल्याचे दिसते.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव यात सर्वाधिक आघाडीवर आहे. मात्र, पटोले यांच्याकडे अध्यक्षपद आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद द्यायचे तर त्या जागेवर नवा अध्यक्ष नियुक्त करावा लागेल. त्यासाठी पुन्हा नव्याने आखणी करावी लागेल. यात काहीसा धोकाही संभवतो. त्यामुळे पक्षातून इतर नावेही चर्चेत आहेत. यात विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि इतरही काही नावांचा समावेश आहे.

दरम्यान, या बैठकीत राज्यातील विविध निवडणुका आणि इतर काही मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते दिल्ली येथे दाखल होत आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमके काय ठरते याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळालाही उत्सुकता आहे.