Eknath Shinde Faction on Devendra Fadnavis: विधानसभा निवडणूक 2024 (Assembly Election 2024) मध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? याबाबत शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. असे असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत शिंदे गटाने मवाळ आणि लवचिक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटल्या प्रमाणे आणि दोन्ही बाजूंनी ठरल्याप्रमाणे विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढली जाईल. मुख्यमंत्री पदाबाबत काही निर्णय असेल तर तो वरच्या पातळीवर होईल. दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ नेत्यांनी विचार करुनच निर्णय घ्यायचा आहे. कधी तुम्ही कधी आम्ही असे दोन्ही बाजंनी ठरलेही असू शकते, त्यामुळे आमची भूमिका लवचिक आहे, असे केसरकर यांनी म्हटले आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चेकडे पाहायचे तर शिंदे गटाकडून काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापून आलेल्या जाहिरातीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. त्यातूनच फडणवीस यांनी निशाणा साधला असल्याचे म्हटले आहे. त्या जाहिरातीमध्ये केंद्रात नरेंद्र मोदी राज्यात एकनाथ शिंदे असे घोषवाक्य देण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला त्याच जाहिरातीत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून जनतेची पहिली पसंती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्या पसंतीस असल्याचे म्हटले होते. त्यावरुन भाजपच्या गोटातून अतिशय तीव्र प्रतिक्रिया आली होती. तेव्हाट ही जाहीरात शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत बिब्बा घालू शकते, असा अंदाज राजकीय अभ्यासकांनी वर्तवला होता. (हेही वाचा, Devendra Fadnavis on CM Face 2024: मुख्यमंत्री पदाचा चेरहा कोण? देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान; एकनाथ शिंदे गटात खळबळ)
देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले. फडणवीस यांनी म्हटले होते की, आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढल्या जातील. परंतू, जर केंद्रीय नेतृत्वाला मुख्यमत्री पदाच्या चेहऱ्यात बदल करावा असे वाटले तर त्या वेळी नेतृत्व तो निर्णय घेऊ शकते. याबाबत आपण काही बोलू शकत नाही. याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष आणि वरिष्ट समितीने घ्यायचा आहे, असे फडणवीस म्हटले होते. त्यामुळ शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा होती.