शेतकरी हितासाठी पाच वर्षे स्थिर सरकार देऊ: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (Photo Credits-ANI)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे गटनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या सर्व आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि अपक्षांनीही आपला पाठिंबा आपल्याला दिला. आपले काही मित्र आपल्या सोबत राहिले नाहीत. पण, तरीही अजित पवार, सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि रामदास आठवले यांच्यासारखे मित्र आपल्यासोबत आहेत. त्यामुळे एक मजबूत सरकार सत्तेवर येत आहे. शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी हे सरकार काम करेन, असा विश्वासही देवेंद्र फडणवी यांनी व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिल्यांदाच भाजप (BJP) कार्यालयात हजेरी लावली. या वेळी ते बोलत होते.

राज्यात असलेली राष्ट्रपती राजवट मध्यरात्री मागे घेण्यात आली. त्यानंतर पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. या वेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विनोद तावडे, आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलताना मोदी है तो मुमकीन है. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच, पक्षाध्यक्ष अमित शाह, जे.पी. नड्डा यांचे आभार मानले. (हेही वाचा, देशाच्या आर्थिक राजधानीवर कब्जा मिळवण्याचा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचा डाव होता: रविशंकर प्रसाद)

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याची बातमी प्रसारमाध्यमांतून झळकली आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात मात्र एकच खड्डा पडला. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रचंड वादळी आणि तितकाच ऐतिहासिक ठरला आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून पत्रकार परिषदा आणि प्रतिक्रियांचा धडाका सुरु आहे.