Maharashtra Cabinet Expansion: 24  तासांत शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
Eknath Shinde (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले. मात्र या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 'लांबत' चालला होता. आता अखेर पहिल्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 24 तासांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार आज रात्री उशिरा किंवा उद्या (9 ऑगस्ट) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मागील दोन दिवसांत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि राज्यपालही दिल्लीत होते. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. ANI Tweet नुसार, मंगळवार 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता राजभवनात हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान एकनाथ शिंदेसोबत आपली मंत्रीपदं सोडून आलेल्या आमदारांचा या मंत्रिमंडळात समावेश असू शकतो. सोबतच भाजपाचे काही बडे नेते देखील शपथ घेऊ शकतात असा अंदाज आहे. यंदा 15 ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री असावा यासाठी आता छोट्या स्वरूपात का होईना पण मंत्रिमंडळ विस्तार उरकण्याचा सरकारचा मानस आहे. असे समोर आले आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळ विस्तार, एकनाथ शिंदे गट आणि भाजपामध्ये सत्तावाटपाचे सूत्र निश्चित? कोणाकडे किती मंत्रिपदे? घ्या जाणून .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला पूर्वनियोजित नांदेड, हिंगोली जिल्ह्यांचा दौरा रद्द केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार असल्याने दौरा रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.

विधिमंडळ अधिवेशन

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन देखील मंत्रिमंडळ विस्तारामुळे रखडलं होतं. आता त्याला देखील मुहूर्त मिळाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, पावसाळी अधिवेशन 10-17 ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात आज रामदास कदम यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बाहेर पडल्यानंतर रामदास कदमांनी देखील 1-2 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत दिले आहेत. तसेच आपला या मंत्रिमंडळात समावेश नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे नव्या सरकारमध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार हे पाहण उत्सुकतेचे आहे.