लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभेच्या दोन रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे. 27 फेब्रुवारीला होणार्या मतदानासाठी भाजपाने आज उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान चिंचवडच्या जागेसाठी लक्ष्मण जगताप यांच्या जागी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कसबा पेठ मधून मुक्ता टिळक यांच्या जागी हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत रासने हे 4 वेळा नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मृत्यू पश्चात रिक्त जागी निवडणूका बिनविरोध करण्याची पद्धत आहे. पण चिंचवड आणि कसबा पेठ मधून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील आपले उमेदवार उतरवणार आहेत. संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे अनेकांचे लक्ष लागणार आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केले आहे. Pune Bypoll Election: पिपरी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? राजकीय वर्तुळात उत्सुकता .
Maharashtra | BJP releases list of its candidates for by-elections in Chinchwad & Kasba Peth Assembly constituencies. pic.twitter.com/wmQxCoranH
— ANI (@ANI) February 4, 2023
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी आणि भाऊ शंकर यांच्यात उमेदवारीवरून वाद झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान लक्ष्मण जगताप यांचा मुलगा आदित्य जगतापने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट टाकली आहे. जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत, अशा आशयाच्या पोस्ट सह कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटोही अपलोड केलेले आहेत. आदित्यच्या या भावनिक पोस्टनंतर आणि आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या चर्चा संपण्याची शक्यता आहे.