
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2021) 1 मार्चपासून सुरु होणार आहे. आज 1 ते 8 मार्च पर्यंतचे कामकाज ठरवण्यात आलं आहे. मात्र कोविड-19 (Covid-19) संकटामुळे अधिवेशनाच्या कालावधीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. दरम्यान, 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करण्यात येणार आहे.
हा महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. मागील वर्षी देखील कोरोना व्हायरस संकटामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 दिवसांत आटोपावे लागले होते. तर मान्सून आणि हिवाळी अधिवेशनाचे कामकाज केवळ 2 दिवस चालले होते. त्यामुळे यंदाचे अर्थसंकल्पीय पूर्ण पूर्ण काळ चालावे अशी विरोधाकांची मागणी आहे. मात्र पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने अधिवेशन कार्यकाळाचा प्रश्न कायम आहे.
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीपण्णी केली आहे. आज झालेल्या चर्चेतून अधिवेशन फार काळ चालवण्याची सरकारी मानसिकता नसल्याचे फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सध्या प्रत्येक आठवड्याला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असली तरी कामकाजाबाबत त्यांनी साशंकता उपस्थित केली आहे.
दरम्यान, लोकसभेचं अधिवेशन कोरोना काळातही नीट चालत असून त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर दुसरा टप्पा देखील पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाची आकडेवारी अधिवेशनामुळे वाढते, असं म्हणता येणार नाही. अधिवेशनामुळे जनतेचे प्रश्न समोर येतात आणि त्यावर उपाययोजना देखील होत असतात. मात्र अधिवेशनचं झालं नाही तर प्रश्न कुठे मांडायचे असा प्रश्न देखील फडणवीस यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर अधिवेशन पूर्ण चार आठवड्यांचं करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.