SSC-HSC Exams 2020-21: महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागल्याने येत्या काही दिवसात राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे की नाही हे स्पष्ट होणार अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा तसेच सोशल डिस्टंसिंग राखा असे देखील सांगण्यात आले. दरम्यान दहावी-बारावीच्या परीक्षा (SSC-HSC Exams) तोंडावर आलेल्या असताना परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होता. मात्र तो दूर करत महाराष्ट्र बोर्डाने (Maharashtra Board) यावर निर्णय दिला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन (Offline) पद्धतीनेच होणार असा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. दरम्यान परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या जाणार याबाबत मात्र कोणतीही माहिती बोर्डाने दिली होती. मात्र त्यावर अखेर बोर्डाने महत्वपूर्ण निर्णय देत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. नक्की वाचा-Maharashtra Board SSC HSC Exam Dates 2021: 12 वी ची परीक्षा 23 एप्रिल, 10 वी परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होईल तर 21 मे रोजी 12वीचा शेवटचा पेपर असेल, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. 10वीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि 12वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.
दरम्यान मागील वर्षी कोरोना संकटामुळे 10 वीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी मार्क्सच्या आधारे निकाल लावण्यात आला होता. तर 12 वीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या. पण निकाल उशिराने लागल्याने पुढे सार्याच प्रक्रियेला वेळ लागला होता. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेत विद्यार्थ्यांना परीक्षांना सामोरे जाण्याचं आवाहन करण्यात आले आहे.