भाजप आमदार प्रशांत बंब यांनी स्वपक्षाचे खासदार प्रताप चिखलीकर यांना पाठवली 23 कोटींची मानहानीची नोटीस
Bjp Mp Pratap Chikhalikar, Mla Prashant Bamb (pc- FACEBOOK)

राज्यातील भाजप आमदाराने स्वपक्षाच्या खासदारालाच 23 कोटींची मानहानीची नोटीस पाठवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब (Bjp MLA Prashant Bamb) यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Bjp MP Pratap Patil Chikhalikar) यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. तसेच खासदार चिखलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवलेल्या पत्रात आपल्याला 'ब्लॅकमेलर' म्हटल्याचंही प्रशांत बंब यांनी म्हटलं आहे.

प्रशांत बंब यांनी या नोटीसीमध्ये खासदार चिखलीकर यांना 23 कोटी रुपयांची भरपाई द्यावी. तसेच पत्रकार परिषदेत सार्वजनिकरित्या माफी मागावी आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेले सर्व संदेश हटवावे, अशी मागणी केली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये चिखलीकर यांनी पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, आमदार प्रशांत बंब यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊ नका. बंब हे एक 'ब्लॅकमेलर' आहेत. (हेही वाचा - लखनौ: हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांच्यावर गोळ्या झाडून हत्या)

प्रशांत बंब यांच्या या नोटीसीमुळे भाजप खासदार चिखलीकर यांना घरचा आहेर दिला आहे. एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे विरोधी पक्षांना टीका करण्यास मोठी संधी सापडली आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मागील महिन्यात एका कार्यक्रमात भाजपच्या लोकप्रतिनिधींवर टीका केली होती. तसेच कोणाचेही नाव न घेता लाचखोर नेत्यांना सीबीआयच्या चौकशीचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही गडकरी यांनी दिला होता.