महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) पुन्हा राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. दरम्यान काल (8 ऑक्टोबर) रात्री उशिरा झालेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आता मराठा समाजाच्या संघटनांनी 10 ऑक्टोबरला दिलेल्या महाराष्ट्र बंदला तूर्तास स्थगिती दिली आहे. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही महा विकास आघाडीमधील मंत्री उपस्थित होते. त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर मराठा संघटनांसोबत बैठक झाली. दरम्यान या बैठकीमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्यानंतर आता 10 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद मराठा संघटनांनी मागे घेतला आहे. याची माहिती उशिरा मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.
मराठा संघटनांनी महाराष्ट्र बंद मागे घेतला असला तरीही आंदोलन कायम ठेवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण स्थगितीविरोधात आजपासून ठोक मोर्चा आयोजित केला आहे. सकाळी तुळजापुरात महिला मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला खासदार संभाजीराजे छत्रपतींसह राज्यभरातील समन्वय उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मात्र मोर्चे न काढण्याचं आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात येत्या रविवारी एमपीएससीच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याची देखील मागणी मराठा संघटनांकडून केली जात आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये या परीक्षा झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असे सांगण्यात आले आहे. मात्र मीडीया रिपोर्ट्सनुसार, काल रात्रीच्या बैठकीमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत जो पर्यंत स्थगिती आहे तो पर्यंत केंद्राचं 10% आर्थिक मागासचे आरक्षण लागू करण्याची तयारी सुरू आहे. त्याकरिता एक समिती बनवून महिन्याभराची मुदत मागितली जाणार आहे. आज याबाबत पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एक बैठक घेणार आहेत.