Rupali Chakankar On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस या म्हणजे अर्धवट ज्ञानाचे परफेक्ट कॉम्बिनेशन; 'त्या' ट्विटवर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया
Rupali Chakankar, Amruta Fadnavis (Photo Credit: Facebook)

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला. आजच्या महाराष्ट्र बंदवरुन देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) टीकास्त्र सोडत आज वसूली चालू आहे की बंद? असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)  यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी! अशा आशयाचे रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले आहे. हे देखील वाचा-Devendra Fadnavis On Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदवर राज्य सरकारचा ढोंगीपणा उघड झाल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांची टीका

रुपाली चाकणकर यांचे ट्वीट-

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंद संदर्भात एक ट्विट केले. त्यातून त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “कोणी मला माहिती देऊ शकेल का. आज वसूली चालू आहे की बंद?,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. तसेच या ट्विटसोबत त्यांनी महाराष्ट्र बंद नाही हा हॅशटॅगही जोडला आहे.

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने आज बंदची हाक दिली. या बंदला समिश्र प्रतिसाद मिळत असताना भाजपकडून विरोध दर्शवण्यात आला. याचदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.