MARD Strike: विद्यावेतनासह इतर मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील 4500 निवासी डॉक्टरांचा बेमूदत संप मागे
Representational Image (Photo credits: Unsplash.com)

विद्यावेतन आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी काल (7 ऑगस्ट) राज्यातील तब्बल 4500 निवासी डॉक्टरांनी बेमूदत संप करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि मार्ड संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत सरकारकडून निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्यात येतील, अशी मान्यता दिल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे.

विद्यावेतनाचा प्रश्न गेल्या चार महिन्यांपासून सुरु असून आंदोलन केल्यानंतर एखाद्या महिन्याचे विद्यावेतन दिले जाते. त्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती ओढावते. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून मार्डचे डॉक्टर विद्यावेतनासाठी आंदोलन करत आहेत. मात्र काल पुकारलेला संप बेमूदत असल्याचे सांगत चारही महिन्यांचे विद्यावेतन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही, असा इशारा मार्डच्या डॉक्टरांनी दिला होता. (MARD Strike: राज्यातील तब्बल 4500 निवसी डॉक्टर बेमुदत संपावर; थकीत विद्यावेतन मिळत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका)

मात्र राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झाली पूरपरिस्थिती आणि त्यामुळे साथीच्या रोगांचा वाढलेला धोका लक्षात घेत डॉक्टरांनी संप मागे घेतला असला तरी मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा 31 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

काय होत्या डॉक्टरांच्या मागण्या?

# राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वेळेत मिळावे.

# मागील चार महिन्यांपासून थकलेले विद्यावेतन देण्यात यावे.

# विद्यावेतनासाठी गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या आंदोलनाचा विचार करण्यात यावा.

# विद्यावेतनात वाढ करुन विद्यावेतन वेळेत द्यावे. तसंच टीबी झालेल्या डॉक्टरांना रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा मिळावी.

बैठकीत मान्य करण्यात आलेल्या संपकरी डॉक्टरांच्या मागण्या

# टीबी झालेल्या डॉक्टरांना रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा मान्य

# नागपूर, लातूर, अकोला आणि अंबाजोगाई या भागातील निवासी डॉक्टरांचे थकलेले विद्यावेतन लवकरात लवकर देण्यात येईल.

# येत्या 15 दिवसात कॅबिनेट मिटींगमध्ये विद्यावेतन वाढीची मागणी मांडणार

# पाच हजार रुपयांनी विद्यावेतनात वाढ करण्यात येणार असून पुढील महिन्यापासून ते लागू करण्यात येईल.

संपकरी निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्यांचा विचार बैठकीत करण्यात आला असून त्यावर तोडगाही काढण्यात आला आहे. त्यामुळे मिळालेले आश्वासन आणि राज्यातील परिस्थिती लक्षात घेत डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे.