महाराष्ट्रात सत्तांतर आणि खातेवाटप झाल्यानंतर पहिल्यांदाच आजपासून शिंदे-फडणवीस सरकार विधिमंडळ अधिवेशनाला सामोरं जाणार आहे. मागील काही दिवसांत अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेली मदत, शिंदे सेनेतील काही आमदारांची अरेरावीची भाषा, सरकारी अधिकार्यांना झालेल्या मारहाणीचा प्रकार यामुळे विरोधक सत्ताधार्यांवर तुटून पडण्याची शक्यता आहे. 6 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या, प्रभाग रचनेत बदल, नगराध्यक्ष, सरपंचांची थेट निवडणूक, विद्यापीठ कायद्यात सुधारणा अशी विविध विधेयके मांडण्यात येणार आहेत. सरकारच्या दृष्टीने पुरवणी मागण्या महत्त्वाच्या आहेत.
दरम्यान काल विरोधकांनी सत्ताधार्यांनी आयोजित चहापानावर निषेध टाकला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार विश्वासघाताने सत्तेवर आले असल्याची बाब विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. यंदाच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांवर सत्ताधाऱ्यांची मदार असणार आहे तर अजित पवार, सुनिल प्रभू आणि नाना पटोले हे विरोधकांकडून आक्रमक होण्याची शक्यता आहे. नक्की वाचा: 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजता राज्यातील जनतेने एकत्र National Anthem गाण्याचे Maharashtra Government चे आवाहन .
17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट असा अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. या कालावधीत शुक्रवारी, 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आहे. दिनांक 20 आणि 21 ऑगस्ट या दिवशी शनिवार-रविवारच्या सुट्ट्या आहेत. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.