उस्मानाबाद: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी जिल्हा परिषद शाळेची भिंत तोडली
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेसाठी थेट जिल्हा परिषद शाळेची भिंतच तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांची उस्मानाबाद (Osmanabad) येथे आज (14 ऑक्टोबर 2019) सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे ज्या शाळेच्या मैदानावर सभा घेण्यासाठी शाळा प्रशासनाने मान्यता दिली. त्या मान्यतापत्रात सभेसाठी कोणत्याही प्रकारे इमारत अथवा शाळा मालमत्तेचे नुकसान करु नये, असे म्हटले होते. तरीही ही भिंत तोडण्यात आल्याने नागरिकांतून अस्वस्थता व्यक्त होत आहे.

उद्धव ठाकरे हे आपल्या उमेदवार प्रचारासाठी मराठवडा दौऱ्यावर आहेत. आज ते उस्मानाबाद येथे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून या सभेची जंगी तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी जे ठिकाण निवडण्यात आले आहे ते ठिकाण जिल्हा परिषद शाळेचे मैदान आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि पक्षाकडून केवळ निवडणूकी काळातील खर्च वाचविण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा, शिवसेनेचा वचननामा फडफडणारा कागद नव्हे तर, महाराष्ट्र कल्याणाचे शिवधनुष्य: उद्धव ठाकरे)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सभा ज्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर होत आहे त्या शाळेत विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षाही सुरु आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सभा या विद्यार्थ्यांसाठी अडचणीची किंवा त्रासदायक ठरणार का याबाबत नागरिकांत चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला शालेय परीक्षा ध्यानात घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपली सभा रद्द करावी. तसेच, शाळेच्या कुंपनाची भींत पुन्हा उभारुन द्यावी, असाही सूर नागरिकांतून उमटताना दिसत आहे.