Voting | (Photo courtesy: archived, edited, representative image)

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभर मतदान होत आहे. संपूर्ण राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 17.79 टक्के मतदान पार पडले आहे. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागात मतदानाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे पण शहरी भागात मात्र नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे.

कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांच्या विशेष तुकड्या राज्यभर तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र पिंपरी मतदार संघातील पिंपरी गाव या परिसरातील बूथ क्रमांक 303 येथे काही परप्रांतीयांनी बोगस ओळखपत्र दाखवत मतदान केले आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गौतम चाबुकस्वार व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एकूण 5 परप्रांतीयांना हे करताना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

तसेच उमेदवार गौतम यांनी मतदान अधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार देखील केली आहे. या सर्व घडलेल्या प्रकारामुळे पिंपरी मतदार संघात सध्या तणावाचे वातावरण पसरले आहे, तसेच अनेक राजकीय नेते मंडळींची तेथे गर्दी जमली आहे.

मतदानाच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारावर गोळ्या झाडून व गाडी जाळून झाला जीवघेणा हल्ला

पिंपरी या मतदार संघातून राष्ट्रवादीने अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार यांनी उमेदवारी मिळाली आहे. यांच्यासोबत ज्यांना जागा मिळाल्या नाहीत असे सुलक्षणा धर, राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ, कॉंग्रेसचे मनोज कांबळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे भाजपकडून बंडखोरी करत अमित गोरखे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, भीमा बोबडे, महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या 'आरपीआय'च्या चंद्रकांता सोनकांबळे यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात फार मोठी लढत पाहायला मिळत आहे.