बबनराव लोणीकर (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात अवघ्या दोन दिवसांनी पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र काही वेळेस नेत्यांनी प्रचारसभेत केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. असाच प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या सरकारमधील भाजप  (BJP)पक्षाचे उमेदवार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्यासोबत झाला आहे. लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली असून त्याबाबत उत्तर देण्यास सांगितले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकर यांनी कथित रुपात एका विधानात असे म्हटले की निवडणूक आम्ही अगदी सहज जिंकू शकतो. कारण त्यांनी तिकिट दिलेल्या मतदारसंघात पैशांचे वाटप केल्याचे लोणीकर यांनी म्हटले आहे. यावर जालन्याच्या निवडणूक आयोगाकडून त्यांना गुरुवारी नोटीस धाडण्यात आली आहे. लोणीकरांच्या या विधानामुळे मतदारांना अनैतिक पद्धतीने प्रभावित केल्याचे रुप दिसून आले आहे. यावर आता लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी पैसे वाटप बाबत म्हटले ते आयोगाने चुकीच्या पद्धतीने घेतले आहे.

लोणीकर यांनी प्रचारसभेदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडिओ ही सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळेच आयोगाकडून लोणीकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. एवढेच नाही लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच काँग्रेसने लोणीकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे.(पाणी मुरतंय? भाजप मंत्री बबनराव लोणीकर यांनी कारखाण्याची जमीन हाडपली?, शेतकऱ्यांकडून आरोप)

तर निवडणूकीच्या काळादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची धडक कारवाई सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुंबईत एक इसमाकडून 2 कोटी 90 लाख 50 हजार किंमतीची रक्कम जप्त केल्याचा प्रकार समोर आला होता.