Sanjay Nirupam (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Assembly Elections) उमेदवार अर्ज भरण्याची उद्याची (4 ऑक्टोंबर) शेवटची तारीख आहे. तर येत्या 21 ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक पार पडणार असून त्याचा निकाल 24 ऑक्टोंबरला लावण्यात येणार आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस (Congress) पक्षात तिकिट वाटपावरुन वाद सुरु झाला आहे. काँग्रेस नेता संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी विधानसभा निवडणूकीसाठी तिकिट कापल्यास पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. तसेच काँग्रेस पक्षाचा प्रचार सुद्धा करणे थांबवणार असल्याचे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. याबाबत निरुपम यांनी ट्वीट करत आपले मत मांडले आहे.

निरुपम यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, असे वाटते की, काँग्रेस पक्षाला माझ्याकडून करण्यात येणारी जनसेवा नकोशी झाली आहे. मी विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाकडे मुंबईतील फक्त एक जागा मागितली होती पण ती सुद्धा पक्षाकडून देण्यात आली नाही.(एकाच मतदारसंघात आघाडीचे दोन उमेदवार; राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके, काँग्रेसकडून शिवाजीराव काळुंगे रिंगणात)

तसेच पक्ष सोडण्याची माझ्यावर वेळ येऊ नये हीच आता अपेक्षा असल्याची निरुपम यांनी भावना व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर पक्षाकडे माझ्या नावाचा विधानसभा निवडणूकीसाठी विचार करावा असे सांगितले होते मात्र या गोष्टीकडे कानाडोळा करण्यात आला आहे. काँग्रेस माझ्यासोबत ज्या पद्धतीने वागत आहे त्यावरुन मी पक्षात जास्त काळ राहीन असे वाटत नाही असे ही निरुपम यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तिकिट देण्यात आले आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांनी विधानसभेसाठी अनुक्रमे 125-125 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत अन्य 38 जागा मित्रपक्षांसाठी सोडणार आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत भोकर येथून चव्हाण, संगमनेर येथून विजय उर्फ बाळासाहेब थोरात, नागपूर उत्तर येथून नितिन राउत आणि लातूर मधून अमित देशमुख यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. अमित देशमुख हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत. त्याचसोबत काँग्रेस वरिष्ठ नेता एकनाथ गायकवाड यांची मुलगी आणि धारावी मधील आमदार वर्षा गायकवाड यांना सुद्धा पक्षाकडून तिकिट देण्यात आले आहे.