नंदुरबार जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ येतात. अक्कलकुवा शहादा, नंदुरबार, नवापूर, अशी या मतदारसंघांची नावे आहेत. या निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे फॅक्टरही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विविध अंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.
अक्कलकुवा मतदारसंघ क्रमांक- 1
विधानसभा निवडणूक 2014 साली भारतीय जनता पक्षाचे आमदार के.सी पाडवी यांनी विजय मिळवला होता. पाडवी यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार रुपसिंग पराडके उभे होते. पाडवी यांना 64 हजार 410 मत पडली होती तर, पराडके यांना 48 हजार 635 मत मिळाली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील अक्कलकुवा मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- अमिशा पाडवी (शिवसेना), के. सी. पडवी (काँग्रेस)
शहादा मतदारसंघात क्रमांक- 2
काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जाणारा शहादा मतदारसंघावर सर्वप्रथम जयकुमार यादव यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावला होता. विधानसभा निवडणूक 2014 साली भारतीय जनता पक्षाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पदमाकर वळवी यांचा अवघ्या 719 मतांनी पराभव केला होता. पाडवी यांना 58 हजार 556 मत मिळाली होती तर, वळवी यांना 57 हजार 837 मत पडली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील शहादा मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- राजेश उदेशसिंग पडवी (भाजप), पद्माकर वळवी (काँग्रेस)
नंदुरबार मतदारसंघ क्रमांक- 3
नंदुरबार मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन काँग्रेसचा विजय मोडला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत गावीत यांनी काँग्रस पक्षाचे कुणाल वसावे यांना पराभूत केले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील नंदुरबार मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- विजयकुमार गावित (भाजप), मोहन सिंह (काँग्रेस)
नवापूर मतदारसंघ क्रमांक- 4
नवापूर मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने पक्षाची पकड राहिली आहे. विधानसभा निवडणूक 2014 साली काँग्रेस पक्षाचे आमदार सुरुपसिंग नाईक यांनी विजय मिनंळवला होता. नाईक यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाचे शरद गावीत उभे होते. या निवडणुकीत नाईक यांना 93 हजार 796 मत पडली होती तर, गावीत यांना 71 हजार 971 मत मिळाली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील नवापूर मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- भारत गावित (भाजप), शिरीष नाईक (काँग्रेस)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.