महाराष्ट्र: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाररॅली दरम्यान शेतकऱ्याने भाजप पक्षाचे टी-शर्ट घालून गळफास लावत संपवले आयुष्य
Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोंबरला पार पडणार आहेत. याच पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत असून राज्यातील विविध ठिकाणी प्रचाररॅली काढल्या जात आहेत. तसेच या प्रचाररॅली वेळी विरोधाकांवर ही आरोपप्रत्यारोप लावले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रचाररॅली दरम्यान एका शेतकऱ्याने भाजप (BJP) पक्षाचे टी-शर्ट घालून गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मृत शेतकऱ्याने भाजप पक्षाच्या घातलेल्या टी-शर्टवर 'पुन्हा आणूया आपले सरकार' असे लिहिले होते. घटना ही शेगाव तालुक्यातील खातखेड मधील असून आज सकाळी 11 वाजता हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू तलवारे असे 35 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. राजू या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर प्रचाररॅली दरम्यान शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे.(100 कोल्हे आले तरी 1 सिंहाची शिकार होत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर पलटवार Watch Video) 

पीडित शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी अद्याप प्रशासनाकडून कोणतेही पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासानाने यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याबाबत अधिक माहिती उघड होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शनिवारी सुद्धा येवले मधील एका शेतकरी तरुणाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. ऐन निवडणूकीच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना थांबत नसल्याने त्यांना सरकारडून देण्यात आलेल्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

तर शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर साउथ वेस्ट मधून रॅलीला संबोधित करत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच विधानसभा निवडणूकीत सुद्धा बाजी मारण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरलो असल्याचे मत फडणवीस यांनी यावेळी मांडले. त्यामुळे लहान मुलगा सुद्धा निवडणूकीचा निकाल काय असेल हे सांगेल. पण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हताश आणि निराश असल्याचे दिसून येत आहे.