आदित्य ठाकरे शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेताना (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने 18 जुलै पासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जळगाव पासून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शिर्डीत यात्रेची सांगता करताना आदित्य ठाकरे यांच्यासह पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते. (आदित्य ठाकरे याच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून जळगाव मधून सुरूवात; महाराष्ट्रभर सामान्यांना भेटणार)

जन यात्रेदरम्यान शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेतानाचा फोटो आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्याचबरोबर या यात्रेत, जनतेने जे मला प्रेम दिलं, आशीर्वाद दिले आणि विश्वास दाखवला, हेच नम्रपणे घ्यायला मी या तीर्थ यात्रेवर निघालो आहे, अशा आशयाचे ट्विट देखील आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे यांचे ट्विट:

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपा युतीने महाराष्ट्रात आपल्या विजयाचा बोलबाला कायम ठेवला. हाच विजयरथ त्यांना विधानसभा निवडणूकीतही यशस्वीपणे चालवायचा आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांकडून चांगलेच प्रयत्न केले जात आहेत. (आदित्य ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री असावेत ही पक्षासह जनभावना: संजय राऊत)

नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. त्याचबरोबर यंदा खुद्द आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.