शिवसेना-भाजप युतीत बिघाडी? उद्धव ठाकरे यांच्याकडून दीर्घ पॉझ घेत सूचक वक्तव्य म्हणाले 'काय ते समजून घ्या..’
Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo: Facebook)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल एक सूचक विधान केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. त्यांच्या वक्तव्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Eections 2019) साठी शिवसेना (Shiv Sena) -भाजप (BJP) युती होणार की हे दोन्ही पक्ष पुन्हा स्वबळाचा निर्णय घेणार असेही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. एसटी महामंडळ आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘पुढचे सरकार आपले असेल आणि पुढचा मुख्यमंत्री?' असे विधान केले आणि त्यानंतर एक मोठा पॉझ घेत 'काय ते समजून घ्या..' असे म्हटले. त्यांच्या या विधानाला उपस्थित शिवसैनिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विधानाचे विविध अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी विद्युत बस सुरु करत आहे. मरापमच्या पहिल्या विद्युत बसचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाकर रावते हे होते. दरम्यान, हा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. मात्र, महायुतीच्या जागावाटपाची पहिली बैठक त्याच्या एक दिवस आगोदर म्हणजेच बुधवारी पार पडली होती. या बैठकीचा हवाला देत भाजप शिवसेनेला 110 जागा सोडत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होती. या वृत्तामुळे समान जागावाटपाचा मुद्दा सोडून शिवसेना भाजपपुढे नमते घ्यायला तयार असल्याचे चित्र तयार झाले होते. या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे काय बोततात याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी जागावाटपाबाबत थेट भाष्य केले नाही. मात्र, मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना ठाम असल्याचा इशारा भाजपला देतानाच शिवसैनिकांनी कामाला जाण्याचे अप्रत्यक्ष संकेतही उद्धव यांनी शिवसैनिकांना दिले. (हेही वाचा, पार्थ पडले रोहीत चढले, बारामतीत नव्या पवारांचा उदय; शिवसेना मुखपत्र 'सामना'तून छोट्या पवारांवर स्तुतीसुमने)

गेल्या काही महिन्यांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये खेचाखेची सुरु आहे. एकत्र लढण्याचे ठरले असले तरी, एकमेकांबद्दल खात्री नसल्याने दोन्ही पक्ष वेळोवेळी सावध भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपली राजकीय ताकद वाढविण्यावरही जोरदार भर दिला आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते शिवसेना भाजप आपापल्या गोटात सहभागी करुन घेत आहेत. दोन्ही पक्षांच्या या वर्तनाचा राजकीय वर्तुळात काढला जात असलेला अर्थ असा की, जर वेळ पडली आणि स्वबळावर लढण्याची वेळ आलीच तर, आपली तयारी असावी. म्हणूनच हे दोन्ही पक्ष कामाला लागल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.