ग्रामीण राजकारणात सर्वात महत्त्वाची मानली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडुकीसाठी (APMC Election 2023) आज मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली पहायला मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागावर वर्चस्व कोण राखणार आता हे पहायला मिळणार आहे. राज्यातील 257 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक लागली आहे. यामधील काही बाजार समितीत्या बिनविरोध देखील झाल्या आहेत. बाजार समित्यांसाठी आज मतदान होणार आहे. तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे.
ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे हे आपल्याला 30 एप्रिललाचं समजणार आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशी लढती होणार आहेत. तर काही ठिकाणी काही पक्ष स्वतंत्र ताकद अजमावत असल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न केले.
"शेतकऱ्यांमध्ये आणि गरिबांमध्ये भाजप विरोधात मोठा राग बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बाजार समितीचा हा निकाल काँग्रेसच्या बाजूने बघायला मिळणार" असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. आमची लढाई कुठल्याही व्यक्ती बरोबर नाही. ज्या प्रमाणे भाजपनं शेतकऱ्यांना फसवलं, गरीबांना फसवलं, त्यांची वाताहत केली. त्याच्या विरोधात हे मतदान आहे. यामुळेच काँगेसच्या बुथवर गर्दी आहे मात्र विरोधकांच्या बुथवर गर्दी नाही.
आशिया खंडातील सर्वात मोठी जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत मतदान सुरू झालं आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पाठबळ असलेले मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर आणि नाशिक जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे या दोन्ही पॅनल प्रमुखांनी लासलगाव बाजार समितीवर आपलेच वर्चस्व राहणार असल्याचा दावा केला आहे.
परळीत मुंडे भावंडांची प्रतिष्ठ पणाला लागली असल्याचे दिसून येत आहे. धनंजय मुंडे दोन तासापासून मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी परळी शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मतदान केंद्रावर तळ ठोकून बसले आहेत. तर दुसरीकडे पंकजा मुंडेसुद्धा याच मतदान केंद्रावर तळ ठोकून बसल्या आहेत.