Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश असताना DHFL चे कपिल वाधवान आणि अन्य 22 जणांना खंडाळ्यातून महाबळेश्वर जाण्यासाठी पत्र देणारे सनदी अधिकारी अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांना आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. कायद्यासमोर सारेच सारखे या नियमानुसार अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून वाधवान कुटुंबाला खंडाळ्याच्या बाहेर पडायला मदत केल्याचे आरोप असताना आता राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई केली आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. आता अमिताभ गुप्ता यांची या प्रकरणी चौकशी होईल मात्र तोपर्यंत त्यांना घरीच बसावं लागणार असल्याचे गृहमंत्र्यांनी ट्वीट करून सांगितले आहे. लॉक डाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबामधील 23 सदस्य महाबळेश्वरला; गृहमंत्रालयाच्या सचिवांनी दिले परवानगीचे पत्र.

महाराष्ट्रासह देशभरात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. या काळात अपवादात्मक स्थिती वगळता नागरिकांना राज्यांर्गत देखील सीमा पार करण्याची मुभा नाही अशावेळेस वाधवान कुटुंब केवळ फिरण्यासाठी खंडाळ्याहून महाबळेश्वर कसं जाऊ शकतं? हा प्रश्न विचारत विरोधकांनीदेखील गृहमंत्र्यांवर टीका केली आहे. दरम्यान वाधवान यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंध आणि ‘YES Bank’कडून घेतलेले कर्ज थकित झाल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंग कायद्या अंतर्गत तपास सुरु आहे. वाधवान पिता पुत्रांना फेब्रुवारी महिन्यातच जामीनावर सोडण्यात आले होते.

अनिल देशमुख यांचे ट्वीट

गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटर हेडवर वाधवान कुटुंबासाठी देण्यात आलेल्या पत्रामध्ये त्यांचा उल्लेख ‘माझे कौटुंबिक मित्र’ असा केल्याने विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. यावर मीडियाशी बोलताना सनदी अधिकार्‍यांच्या निलंबनासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो त्यामुळे चौकशी आणि सल्ला मसलत करून अमिताभ गुप्ता यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.