कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) देशभरातील सर्व पर्यटन स्थळे गेले काही महिने बंदच होती. मात्र हळूहळू अनलॉकच्या टप्प्यात ही पर्यटनस्थळे कोरोना व्हायरसची योग्य ती खबरदारी घेत सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळं अजिंठा-वेरुळ लेणी (Ajanta Verul Caves) देखील पर्यटकांसाठी उद्यापासून सुरु होणार आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित सर्व नियमांचे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन 10 डिसेंबरपासून हे पर्यटन स्थळ लोकांसाठी सुरु होतील. तसेच लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, या पर्यटनस्थळांवर लोकांसाठी गाइड म्हणू काम करणा-यांच्या देखील आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.
त्याचबरोबर या पर्यटनस्थळाचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पर्यटनस्थळ बंद असल्याकारणाने या पर्यटनावर व्यवसाय करणा-या येथील स्थानिक लोकांवर आर्थिक समस्या ओढावली होती. त्यामुळे जिल्हाधिकरी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.हेदेखील वाचा- Kartiki Wari 2020: संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी वारी वर कोरोनाचं सावट; संचारबंदी लागू असल्याने यंदा असा असेल कार्यक्रम
देशातील अनेक भागातील पर्यटनस्थळे याआधी सुरु झाली होती. मग महाराष्ट्रातील पर्यटनस्थळही सुरु करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे येथील प्रशासनाची राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आज या लेणीच्या परिसराची स्वच्छता केली जाणार आहे.
यासाठी केवळ ऑनलाईन तिकिट उपलब्ध होणार आहे. ज्यात दर दिवसा दोन सत्रात प्रत्येकी 1000 पर्यटकांना ऑनलाईन तिकिट उपलब्ध होईल. त्यामुळे तिकिट केंद्रावर तिकिटे मिळणार नाही असेही सांगण्यात येत आहे. वेरुळ, अजिंठा लेणीबरोबरच बीबी का मकबरा, पाणचक्की तसेच औरंगाबाद लेणींचाही समावेश या निर्णयामध्ये आहे.