उच्च न्यायालयाने अकरावीच्या प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (CET) रद्द केल्यानंतर शिक्षण विभागाकडून अकरावीची प्रवेशप्रक्रिया आजपासून (14 ऑगस्ट) सुरू होणार आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती या महापालिका क्षेत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तर, राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश देण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल (शुक्रवार, 13 ऑगस्ट) ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांना आजपासून https://11thadmission.org.in या संकेस्थळावरुन प्रवेशासाठीच्या अर्जाचा पहिला भाग भरुन प्रवेशासाठी नोंदणी करायची आहे. या अर्जाचा दुसरा भाग येत्या 17-22 ऑगस्ट दरम्यान भरायचा आहे. महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी 27 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात 30 ऑगस्टपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी 30 ऑगस्टलाच रिकाम्या जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यात प्रवेशासाठी दोन्ही डोस अनिवार्य, रिपोर्ट्स नसल्यास 14 दिवस क्वारंटाइन
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या अंतर्गत निकालात विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळाले असल्याने यंदाच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विशेष चुरस होणार आहे. नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी दरवर्षी आवश्यक असणारे पात्रता गुण (कटऑफ) यंदा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत दिवाळी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल केले जाणार, अशी शक्यता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी व्यक्त केली आहे. यामुळे दिवाळीनंतर मुंबईतील शाळा आणि महाविद्यालय सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ होऊ लागली आहे. यामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरु करण्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.