Mahadev Jankar On BJP: भाजपने आम्हाला धोका दिला. पण आम्ही कधीही भाजपला धोका दिला नाही. आम्ही जेव्हा भाजपला धोका देऊ तेव्हा त्यांचे सरकार राहणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Paksha) अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला (BJP) दिला आहे. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जाण्याने माझे मोठे नुकसान झाले. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याहीपेक्षा माझी वाताहत अधिक झाली, अशी भावोद्गारही जानकर यांनी काढले आहेत. ते परभणी (Parbhani) येथे रासप कार्यकर्ता आणि विजय निर्धार मेळाव्यात बोलत होते.
रासपा नाराज
महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष भाजपचा मित्रपक्ष मानला जात असे. स्वत: महादेव जनकर हे महायुती सरकारमध्ये राज्यात मंत्री होते.या वेळी मात्र लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जागावाटप करत असताना भाजपने महायुतीमध्ये रासपाला विचारात घेतले नाही. त्यामुळे ते नाराज आहे. भाजपला इशारा देतानाच रासपा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे, असे सांगितले. परभणीचे आपल्यावर प्रचंड प्रेम आहे. परभणीने आपल्याला आमदार दिल्याचेही ते सांगितले. या मेळाव्यास रासपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (हेही वाचा, Mahadev Jankar: मी पंतप्रधान होणारच, राष्ट्रीय समाज पक्षाचे अंतिम ध्येय दिल्ली : महादेव जानकर)
गोपीनाथ मुंडे यांची आठवण
दरम्यान, या वेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले आपणास मुख्यमंत्री व्हायचे नाही. आपली ती इच्छाही नाही. पण, पाच मिनिटांसाठी का होईना, आपल्याला पंतप्रधान व्हायचे आहे. आज गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. त्यांच्या अकाली जाण्याने माझे मोठे नुकसान झाले. ते असते तर आज मी केंद्रात मंत्री असतो. त्यांच्या जाण्यामुळे पंकजा मुंडे यांच्यापेक्षाही माझी वाताहात अधिक झाली, असे जानकर म्हणाले. आपण परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याचेही महादेव जानकर म्हणाले. (हेही वाचा, Gopinath Munde Birth Anniversary: गोपीनाथ मुंडे, व्यक्तिगत जीवन आणि राजकीय संघर्ष; घ्या जाणून)
'आम्ही लढू आणि जिंकू'
महायुतीतील घटक पक्षांची भाजपला जर गरज वाटत नसेल तर आम्हालाही त्यांची गरज नाही. लोकसभेसाठी जागावाटप दिल्ली येथून होते आहे. त्यांना आम्ही महायुतीत असूनही घटक पक्षांना, मित्रपक्षांना विचारात घ्यावे असे वाटत नाही. त्यामुळे त्यांना जर आमची गरज नाही तर आम्हालाही त्यांची नाही. आम्ही लढू आणि जिंकू. आम्हाला कितीही डावललं तरी फरक पडत नाही. आमची लढाई आमच्या मार्गाने आणि पद्धतीने सुरु आहे, असेही जानकर या वेळी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी गल्ली ते दिल्ली बैठकांचे सत्र सुरु आहे. काँग्रेस आणि भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. माित्र, त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटप केव्हा जाहीर होणार तसेच केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर करणार याबाबत उत्सुकता आहे.