Sharad Pawar, Sanjay Raut (Photo Credit: Twitter)

महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) मतभेद असल्याच्या बातम्या सतत कानावर पडत आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेस (Congress) स्वबळावर लढणार असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांत झळकत आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे भाजपचे भाकीत खरे ठरते की काय? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. "महाविकास आघाडी अत्यंत सुरळीत सरळसोट आणि योग्य मार्गाने पुढे निघालेली आहे. परंतु, बाहेर उगाचच संभ्रम पसरवले जात आहेत. मात्र, अशा प्रकारच्या अफवा आणि भ्रम निर्माण करून सरकारचा बाल बाका होणार नाही", असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत 2 दिवस बैठकीनंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. नुकताच संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. आम्ही काही कारणास्तव भेटलो आहोत. सरकार अस्थिर होईल, या भ्रमात कोणाही राहू नये. प्रसारमाध्यमांतून भ्रम निर्माण केले जात आहेत. परंतु, तुम्हाला कृतीतूनच दिसेल की सरकार किती गंभीर आहे. जर, कोणी प्लॅन ए आणि प्लॅन बी केला असेल, त्या सगळ्यांना मी सांगतो आमच्याकडे प्लॅन प्लस आहे' असा टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. हे देखील वाचा-Ahmednagar Mayoral Election: अहमदनगर महापौर निवडीसाठी बुधवारी ऑनलाईन सभा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून सतत स्वबळाचा सूर लावला आहे. तसेच काँग्रेस या पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची वक्तव्ये वारंवार केली जात आहे. त्यांना काही काँग्रेस नेते साथ देत आहेत. तर, काही नेते मात्र स्वबळाच्या नाऱ्यामुळे नाराज आहेत.