Ahmednagar Municipal Corporation | (Photo courtesy: archived, edited, images)

अहमदनगर महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) महापौर पदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडीने (Maha Vikas Aghadi) बाजी मारली आहे. अहमदनगरच्या महापौर पदी शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या रोहिणी शेंडगे (Rohini Shendage) , तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या गणेश भोसले (Ganesh Bhosale) यांची निवड झाली. महापौर आणि उपमहापौर पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन सभेत दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे पीठासीन अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या या सभेत दोन्ही पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडूण आले. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडे या पदासाठी उमेदवारच नव्हता.

अहमदनगर महापालिका महापौर पद हे या वेळी अनुसूचित जातीसाठी राखवी होते. या पदासाठी महाविकासाआघाडीने संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचा उमेदवार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उपमहापौर पदासाठी दिला. तर काँग्रेसने महाविकाआघाडीचा घटक पक्ष म्हणून किल्ला लढवला. भाजपकडे मात्र, या पदासाठी सर्व निकष पूर्ण करणारा उमेदवार नव्हता. परिणामी भाजपला उमेदवार देता आला नाही. निवडणूक बिनविरोध पार पडली. (हेही वाचा, Akola Zilla Parishad And Panchayat Samiti By-Election 2021: अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक, जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम आणि विद्यमान स्थिती)

दरम्यान, महापौर निवडणुकीवरुन शिवसेनेच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती आहे. महापौर पदाच्या निवडणुकीवरुन हे दोन्ही गट एकमेकांना भीडले. यात शिवसेना नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना- 23, राष्ट्रवादी-18, भाजप-15, काँग्रेस-5, बसपा-4, सपा-1, अपक्ष-2, एकूण – 68

दरम्यान, अहमदनगरच्या रुपात भाजपकडून तिसरी महापालिका गेली आहे. या आधी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने अहमदनगरमध्ये सत्ता मिळवली होती. परंतू, महाविकासआघाडी स्थापन झाल्यापासून सुरुवातीला सांगली मग जळगाव आणि आता अहमदनगरची महापालिका भाजपने गमावली आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अहमदनगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीची सत्ता असताना महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौरपदी मालन ढोणे होत्या.