Maha Vikas Aghadi Cabinet Expansion: शिवसेना पक्षाकडून गुलाबराव पाटील, अनिल परब यांच्यासह 8 नव्या चेहर्‍यांना; तर या '3' अपक्षांना मंत्रिमंडळात मिळणार संधी?
Shiv Sena | (Photo Credits-ANI)

Maharashtra Cabinet Expansion: महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज दुपारी 1 च्या सुमारास होणार आहे. त्यासाठी विधानभवन परिसरात तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आज सुमारे 36 संभाव्य मंत्री शपथ घेणार असून त्यामध्ये शिवसेना 8 नव्या चेहर्‍यांना आणि 3 अपक्ष आमदारांना संधी देण्याची शक्यता आहे. सध्या मीडीया रिपोर्ट्सनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये गुलाबराव पाटील, अनिल परब ,उदय सामंत यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तर बच्चू कडू, राजेंद्र पाटील यड्रावकर या शिवसेनेला पाठिंबा देणार्‍या अपक्षांनादेखील कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आज संधी मिळणार आहे. Maharashtra Cabinet Expansion Live News Updates  इथे पहा.

दरम्यान 28 नोव्हेंबर दिवशी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडे सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर दोनदा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. आज शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाचे आमदार देखील शपथ घेणार आहे.

ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेच्या या नेत्यांना मिळणार संधी

१) अनिल परब

२) उदय सामंत

३) गुलाबराव पाटील

४) शंभूराजे देसाई

५) दादा भुसे

६) संजय राठोड

७) अब्दुल सत्तार

८) राजेंद्र पाटील यड्रावकर

९) शंकरराव गडाख

१०) बच्चू कडू

११) संदीपन भुमरे

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून अजित पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आज मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवार, नवाब मलिक शरद पवार यांच्या मुंबईतील राहत्या घरी 'सिल्वर ओक' वर त्यांच्या भेटीला गेले आहेत.