LTT-Jaynagar Express: नाशिक येथे जयनगर एक्सप्रेस 11 डबे रुळावरुन घसरले; एकाचा मृत्यू, 4-5 जखमी
Indian Railways | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

मुंबईहून नाशिकला निघालेल्या LTT-जयनगर एक्स्प्रेसचे (LTT-Jaynagar Express) 11 डबे रुळावरुन (Pawan Express 11 Coaches Derailed) घसरले आहेत. ही घटना आज दुपारी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लहवी येथे घडली. रेल्वेचे डबे रुळावरुन घसरल्याने त्या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती कळताच रेल्वे प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. रेल्वेचे वैद्यकीय पथकही पाचारण झाले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. डबे घसरल्याने घडलेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, 4-5 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवरुन जयनगर एक्सप्रेस आपला प्रवास सुरु करते. पुढे ठाणे, कल्याण अशि महत्त्वाची स्टेशन्स घेत ही एक्सप्रेस नाशिक मार्गे पुढील प्रवासास निघते.

मुंबई मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.10 वाजणेच्या सुमारास 11061 LTT-जयनगर एक्स्प्रेसचे (LTT-Jaynagar Express) काही डबे लहवित आणि देवलाली (नाशिकजवळ) दरम्यान डाऊन मार्गावर रुळावरून घसरले. अपघात निवारण गाडी आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अधिकचा तपशील लवकरच सांगितला जाईल, असेही सुतार यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Indian Railway: गेल्या वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात फुकटात प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत जबरदस्त वाढ, रेल्वेकडून 1.78 कोटी जणांना पकडले)

प्राप्त माहितीनुसार नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या लहवित येथे रेल्वेचे डबे लाईन तुटून घसरले. रल्वे पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी दाखल झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार जवळपास नाशिक रेल्वेस्टेशनपासून 12 km अंतरावर हे डबे रुळावरुन खाली घसरले. घटना नुकतीच घडली असल्याने झालेल्या एकूण नुकसान आणि परिस्थितीचा अंदाज येऊ शकला नाही. विस्तारीत माहिती मिळण्यासाठी काही विलंब लागू शकतो.

ट्विट

डबे घसरल्याने अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील रेल्वे लाईन सध्यास्थितीत थांबविण्यात आली आहे. मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली.