प्रेमात धोका मिळालेल्या प्रियकर-प्रियसीची पुन्हा भेट करून देण्याचे अश्वासन देत त्यांच्याकडून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या (Fraud Case) लव्ह गुरूला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी जोगेश्वरी (Jogeshwari) येथील तरूणीची फसवणूक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी हा अनेकांच्या मोबाईलवर मॅसेज करून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असे. तसेच यासाठी त्याने www.famousloveproblemsolutions.com ही वेबसाईस सुरू केली होती. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर लगेच फोन केला जात असे. आरोपींनी आतापर्यंत अनेक महिलांची फसवणूक केल्याची पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे.
प्रेमात धोका मिळालेल्या प्रेमींना सल्ला देण्याच्या नावावर हा लव्ह गुरु लोकांना लुटण्याचे काम करत असल्याचा आरोप आहे. जोगेश्वरी येथे राहणारी 22 वर्षीय तरुणी गोरेगाव पूर्वच्या लोटस पार्क बिझनेस हबमधील एका ऑफिसमध्ये मॅनेजर आहे. काही दिवसांपासून तिचा प्रियकर तिच्याशी बोलत नव्हता. मात्र, तरुणीचे त्याच्यावर खूप प्रेम होते, तिला तो हवा होता. यादरम्यान, तिच्या मोबाईलवर लव्ह गुरुचा मेसेज आला. तिने मेसेजमध्ये दिलेल्या www.famousloveproblemsolutions.com या वेबसाईटवर क्लिक केले. त्यानंतर लगेच तिला फोन आला. त्यावेळी लव्ह गुरूने तरुणीकडे तिची समस्या विचारली. तरूणीची समस्या विचारल्या नंतर आरोपीने तिला पूजा आणि हवन करण्याचा सल्ला दिला. तसेच या गोष्टी केल्याने तिला तिचे प्रेम नक्की मिळेल, असे अश्वासन लव्ह गुरूने संबंधित तरुणीला दिले. एवढेच नव्हेतर तिला राजस्थानमधील सीकरच्या आयसीआयसीआय बँकेचा खाते क्रमांक देऊन त्यात दहा हजार ट्रान्सफर करण्यास सांगितले. हे देखील वाचा- सेक्स क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणांकडून उकळले 50 हजार; तरूणीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
महत्वाचे म्हणजे, या घटनेतील आरोपी हा तरुणीला पुजा आणि हवन केल्याचे खोटे फोटोही व्हाट्सऍप करायचा. अखेर लव्ह गुरूने तिला मोठी पुजा करायची आहे, यासाठी 76 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी तरूणीने तिच्या भावाच्या खात्यावरून पैसे पाठवले. त्यानंतर तिच्या भावाने तिच्याकडे विचारणा केली असता तिने सर्व प्रकार आपल्या भावाला सांगितला. हे ऐकताच तरुणीच्या भावाने तिला स्थानिक पोलीस ठाण्यात घेऊन गेला. तसेच त्या लव्ह गुरूच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी लव्ह गुरुविरोधात कलम 420, 34 तसेच आयटी अॅक्ट 66 (सी), 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लव्ह गुरु निखिल कुमार सुरेश कुमार भार्गवला (वय 27) राजस्थानच्या सीकरीमधून अटक केली. त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या महिलांकडून 45 हजार, 30 हजार आणि 1 लाख रूपयांपर्यंत पैसे उकळले आहेत. तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही मॅसेजला बळी पडू नका, असे पोलिसांकडून अवाहन करण्यात आले आहेत.