महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून (Loudspeaker) अजाननंतर हनुमान चालिसावरून निर्माण झालेला वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. यावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत. हा वाद वाढत असल्याचे पाहता आज महाराष्ट्र सरकारने लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीबाबत महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक शिष्टमंडळ केंद्र सरकारला भेटेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही यावर केंद्र सरकारशीही बोलू व निर्णय घेऊ, तसेच हा सर्वोच्च न्यायालयाचा विषय असल्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये. कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मंत्री दिलीप पाटील यांनी सांगितले. तसेच याचे कोणी उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई करतील, असेही ते म्हणाले. अशाप्रकारे केंद्राने लाऊडस्पीकरवर राष्ट्रीय स्तरावरील नियम केला तर राज्यांमध्ये प्रश्न निर्माण होणार नाहीत त्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्राला भेटून चर्चा करतील, असे या बैठकीमध्ये ठरले.
गृहमंत्री म्हणाले, ‘भोंग्यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्या आधारेच राज्यात भोंग्यांचा वापर, त्याला द्यायची परवानगी, त्यासाठीच्या अटी आणि शर्थी, त्यासाठीची वेळ, आवाजाची मर्यादा हे सर्व स्पष्ट केले आहे. काही पक्ष भोंगे उतरवण्याची मागणी करत आहेत, मात्र भोंगे लावणे किंवा उतरवणे यासंदर्भातील कोणतीही तरतूद नाही व त्यामुळे राज्य सरकार त्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकत नाही.’ (हेही वाचा: 'हनुमान चालिसा म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा, बाळासाहेबांच्या चिरंजीवांनी साहेबांचे हिंदुत्व मिठी नदीत बुडवले'- Chandrakant Patil यांचे टीकास्त्र)
दरम्यान, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आज बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गेल्या 3-4 दिवसांत ज्या पद्धतीने पोलिसांचा वापर करून विरोधी पक्षाच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न झाला, हे पाहून संवादासाठी जागा उरली नसल्याचे ते म्हणाले. महत्वाचे म्हणजे या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील उपस्थित नव्हते. महाराष्ट्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. परंतु राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे त्यांच्या पक्षाने आधीच स्पष्ट केले होते.