
पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी लोणावळा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण. मात्र यंदा पावसाळ्यात लोणवळ्याला जाण्यापूर्वी पर्यटक अनेकदा विचार करतील. कारण लोणावळ्यातील प्रसिद्ध हॉटेल्स, रिसॉर्टवर अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) ने छापे मारले आहेत. यात बहुतांश ठिकाणी मुदतबाह्य पदार्थ वापरून तयार केलेल्या खाद्यपदार्थाची विक्री होत असल्याचे आढळून आले.
पर्यटकांना सुरक्षित आणि स्वच्छतापूर्ण अन्न मिळत असल्याची खात्री करण्यासाठी एफडीएने ही मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी लोणवळ्यातील 10 हॉटेल्सची तपासणी केली. या तपासणीत सुप्रसिद्ध रिसॉर्ट्स, हॉटेल्स मध्ये देखील अन्न आणि सुरक्षा कायदा धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून आले.
आगामी मान्सूनचा हंगाम लक्षात घेऊन हॉटेल्सची विशेष तपासणी करण्यात आली होती. यातून पर्यटकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळतील की नाही याची खात्री करायची होती. मात्र यातून समोर आलेला परिणाम धक्कादायक असल्याचे एफडीएचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी सांगितले.
मुदतबाह्य डाळी, पिठे, ब्रेड, चिकन, फिश फिंगर, मसाले, सडक्या भाज्या तसंच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाची एकाच फ्रीजमध्ये केलेली साठवणूक या गोष्टी तपासणीत आढळून आल्या.
हॉटेल्समधील स्वयंपाकघर अस्वच्छ होते. तसंच कालबाह्य पदार्थही होते. त्यामुळे लवकरच त्यांना नोटीस जारी करण्यात येईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती एफडीएचे सहाय्यक आयुक्त एस.बी. नारागुडे यांनी दिली आहे.