Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यानंतर एकीकडे शिंदे-फडणवीस सरकार स्थिरस्थावर होत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने आपली पक्ष संघटना मजबूत करत 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटातील शिवसेनेला आता भाजपशी लढाई लढायची आहे आणि उत्तर प्रदेशात भाजपचे बरेच वर्चस्व आहे हे त्यांना माहीत आहे. उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हाप्रमुखांची नव्याने घोषणा केली आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाराष्ट्रात भाजपशी युती करून सरकार स्थापन केले. आता उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना अध्यक्ष अनिल सिंह यांनी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांतर्गत 30 जिल्ह्यांच्या जिल्हाप्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे.

या जिल्ह्यांमध्ये मुरादाबाद, मेरठ, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, फर्रुखाबाद, नोएडा, बुलंदशहर, कासगंज, फिरोजाबाद, अमरोहा, बरेली, पिलीभीत, मिझारपूर, आंबेडकर नगर, लखीमपूर खेरी, सीतापूर, गोंडा, कन्नौज, बहराइच, बस्ती, चंदौली, प्रतापगड, बाराबंकी, फतेहपूर, कौशांबी, बांदा, चित्रकूट, सोनभद्र, प्रयागराज आणि आग्रा यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची लढाई सुरु असताना सरन्यायाधीशासह मुख्यमंत्र्याच्या भेटीवर विरोधकांचं टीकास्त्र)

प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्यक्ष दौरा करून निवडणूक लढवता येईल अशी मजबूत संघटनात्मक बांधणी निश्चित करणार असल्याचे राज्य शिवसेना प्रमुख म्हणाले. या वर्षअखेरीस होणाऱ्या नगर पालिका निवडणुकाही शिवसेना लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल सिंह म्हणाले की, शिवसेनेचे प्रमुख नेते उत्तर प्रदेशलाही भेट देतील आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव करतील.