Lok Sabha Elections 2019 Phase 3: महाराष्ट्रात 23 एप्रिलला बारामती, माढा, जळगाव, अहमदनगर यांसह 14 मतदारसंघात होणार मतदान; पहा कोणात होणार चुरशीची लढत
Representational Image (Photo Credits: PTI)

राज्यात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 7 तर दुसऱ्या टप्प्यात 10 मतदारसंघात मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघात मतदान होणार आहे. यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.

जळगाव:

जळगाव मध्ये भाजपचे उन्मेष पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुलाबराव देवकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीच्या अंजली बावीस्कर निवडणूकीच्या रिंगणात आहे.

रावेर:

रावेर मतदारसंघात भाजप पक्षाच्या रक्षा खडसे, काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे नितीन कांडेलकर निवडणूकीसाठी सज्ज झाले आहेत.

जालना:

जालना मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे, काँग्रेसचे विलास औताडे आणि बहुजन वंचित आघाडीचे शरदचंद्र वानखेडे यांच्या लढत होणार आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर जालन्यातून निवडणूक कोण लढवणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raisaheb Danve) आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यात उमेदवारीवरुन निर्माण झालेला वाद अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीतून सुटला आणि अखेर दानवेंचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

औरंगाबाद:

औरंगाबाद मतदाससंघातून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांच्यात निवडणूकीसाठी लढत होणार आहे.

रायगड:

रायगड मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार अनंत गीते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि बहुजन वंचित आघाडीच्या सुमन कोळी यांच्यात लढत होणार आहे. गीतेंविरोधात निवडणूक जिंकणे आव्हानात्मक ठरणार आहे.

पुणे:

पुणे मतदरासंघात मुख्य लढत भाजपचे गिरीश बापट, काँग्रेसचे मोहन जोशी आणि बहुजन वंचित आघाडीचे अनिल जाधव यांच्यात होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ: गिरीश बापट, मोहन जोशी की वंचित आघाडीचे अनिल जाधव? पुणेकर ठरवणार आपला खासदार कोण?

बारामती:

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघातून भाजपच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादी कांग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ: सुप्रिया सुळे यांची विजयी परंपरा कांचन कुल रोखणार का?

अहमदनगर:

काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपत प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे पाटील प्रथमच निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम पाटील यांच्याशी विखेंचा सामना होणार आहे.

माढा:

माढा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयमामा शिंदे आणि बहुजन वंचित आघाडीचे विजय मोरे यांच्यात लढत होणार आहे. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः उमेदवारी मागे घेऊन संजय मामा शिंदे यांना तिकीट दिले आहे. माढा लोकसभा मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय शिंदे विरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर काट्याची टक्कर

सांगली:

सांगली मतदारसंघात भाजपचे संजयकाका पाटील, स्वा. शेतकरी संघटना विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ: भाजप उमेदवार संजय पाटील यांना स्वाभिमानीच्या विशाल पाटल यांचे आव्हान, गोपीचंद पडळकर ठरणार किंगमेकर

सातारा:

सातारा मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस उदयनराजे भोसले यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. तर बहुजन वंचित आघाडीचे सहदेव ऐवळे आणि बसपाच्या आनंदा थोरवडे हे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघ: उदयनराजे भेसले विजयाची हॅट्रिक मारणार की, भाजप-शिवसेना युतीचे नरेंद्र पाटील इतिहास बदलणार?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग:

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदरासंघात शिवसेनेचे विनायक राऊत, काँग्रेसचे नविनचंद्र बांदोडकर, तर महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षातून निलेश राणे आणि बहुजन वंचित आघाडीचे मारुती जोशी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोकणात शिवसेना विरुद्ध राणे ही चुरशीची लढत होणार आहे.

कोल्हापूर:

कोल्हापूर मतदारसंघातून शिवसनेचे संजय मंडलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अरुणा माळी देखील निवडणूकीच्या रिंगणात आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ: धनंजय महाडिक विरुद्ध संजय मंडलिक संघर्षात सतेच उर्फ बंटी पाटील किंगमेकर

हातकणंगले:

हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने आणि स्वा. शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात चुरशीची लढाई होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीतून अस्लम सय्यद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ: खासादार राजू शेट्टी यांची हॅट्रिक की धैर्यशील माने यांचा विजयी गुलाल?

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान प्रक्रीया पार पडणार असून पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या (22 एप्रिल) आणि चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी पार पडेल. मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.